केंद्र सरकारच्या पंतप्रधान शेतकरी सन्मान निधीच्या धर्तीवर राज्यात नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेची घोषणा राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज अर्थसंकल्पात जाहीर केली. याशिवाय शेतकऱ्यांना एक रुपया भरून पीकविमा योजनेत सहभागी होता येईल, अशीही घोषणा त्यांनी केली.
जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या चरणी दंडवत घालून ‘टिकवावे धन, ज्याची आस कर जन’ या तत्वाला अनुसरून अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बजेट मांडण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी शेतकऱ्यांच्या घोषणांचा पाऊस पाडला.
पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेच्या धर्तीवर मी राज्यात नमो शेतकरी महासन्मान निधी योजना जाहीर करतो. या योजनेत केंद्र सरकारकडून मिळणाऱ्या आर्थिक मदतीत सहा हजार रुपयांची भर घालण्यात येणार आहे. म्हणजे राज्यातील शेतकऱ्यांना आता दरवर्षी १२ हजार रुपये मिळणार आहेत. या योजनेचा फायदा राज्यातील १ कोटी १५ लख शेतकऱ्यांना होणार आहे. या योजनेसाठी ६ हजार नऊश कोटी रुपये रक्कम प्रस्तावित केली आहे.
याशिवाय शेतकऱ्यांना पीकविम्यासाठी त्यांच्या हिश्श्याची रक्कम भरावी लागणार नाही. त्याऐवजी राज्य सरकार तो हिस्सा भरणार आहे. शेतकऱ्यांना एक रुपया भरून योजनेत सहभागी होता येईल. त्यासाठी ३३१२ कोटी रुपयांची तरतूद करण्यात येईल.