जेव्हा कुठले युद्ध होते तेव्हा त्या देशाची ताकद त्यांच्याकडे असलेल्या लष्करावरून ठरते. समजा उद्या दोन देश एकमेकांना भिडणार असतील तेव्हा त्यांना एकमेकांच्या ताकदीची कल्पना असतेच. म्हणून प्रत्येक देश आपल्या संरक्षणासाठी महत्वाची आर्थिक तरतूद करत असतो. आपल्या भारताची लष्करी ताकद किती आहे? असा प्रश्न पडत असेल तर हा लेख शेवटपर्यंत वाचा.
जगात भारतीय लष्कर कितव्या स्थानावर आहे हे नुकतेच एका ब्रिटिश वेबसाइटवर प्रसिद्ध करण्यात आले आहे.
मिलिटरी डायरेक्ट या संरक्षण क्षेत्रातील वेबसाईटने नुकतंच एक सर्वेक्षण पार पाडलं. या सर्वेक्षणातून आलेल्या माहितीनुसार जगातील सर्वाधिक ताकदवान सैन्याच्या यादीत भारतीय सैन्य चौथ्या क्रमांकावर आहे. तर पाकिस्तानी सैन्य पंधराव्या क्रमांकावर आहे. यामध्ये जगातील सर्वाधिक ताकदवान सैन्यात पहिला क्रमांक चीनच्या सैन्याचा आहे. अमेरिकेला मागे टाकत चीनने पहिला क्रमांक पटकावला आहे. दुसरा क्रमांक अमेरिकेचा आहे. रशिया तिसऱ्या क्रमांकावर आहे आणि त्या पाठोपाठ भारत आणि फ्रान्स यांचा नंबर लागतो.
अमेरिका संरक्षणावर सर्वात जास्त खर्च करत असली तरी चीनने पहिला क्रमांक पटकावला आहे, ही गोष्ट ध्यानात घेण्यासारखी आहे. या वेबसाईटवर गुणांनुसार रँकिंग दिले जाते. चीनला शंभरपैकी ८२, अमेरिका ७४, रशिया ६९, भारत ६१, तर फ्रान्सला ५८ गुण आहेत. ब्रिटन नवव्या स्थानावर असून त्यांच्या वाट्याला ४३ गुण आले आहेत.
हे गुण देताना प्रत्येक देशाची संरक्षणासाठी आर्थिक तरतूद, लष्करातील जवान, लष्करी साहित्याचे एकूण वजन, कर्मचाऱ्यांना मिळणारे वेतन, देशाच्या सैन्याची एकूण श्रम शक्ती तसेच देशाची लोकसंख्या, भूगोल आणि विकासावर अभ्यास करुन सैन्याला गुण देण्यात आले आहेत.
भारत एकूण ७१ अब्ज डॉलर इतकी तरतूद संरक्षणासाठी करतो. अमेरिका सर्वात जास्त म्हणजे ७३२ अब्ज डॉलर, तर चीन एकूण २६१ अब्ज डॉलर इतका संरक्षणासाठी खर्च करतो. वेगवेगळ्या अभ्यासानुसार सर्वाधिक २५ ताकदवान सैन्यांना या यादीत जागा देण्यात आली आहे. उद्या समजा युद्ध झालंच तर चीन समुद्रातील युद्ध, अमेरिका हवाई तर रशिया जमिनीवरील युद्ध जिंकू शकतो, असे अनुमानही काढण्यात आले आहे. हे अनुमान त्या त्या दलाचे देशाकडे किती सैन्य आहे यानुसार काढले गेले आहे.
जगात पहिल्या पाच मध्ये नंबर लागणे ही नक्कीच भारतीयांसाठी अभिमानाची बाब आहे. अर्थात युद्ध हे केवळ नंबर गेम वर जिंकलं जात नाही हेही तितकंच खरं आहे. वेळ आली तर भारतीय लष्करही कुठल्याही वरच्या क्रमांकाच्या देशाला धूळ चारू शकतो हे नक्की. तुम्हाला काय वाटतं नक्की कळवा.
लेखिका: शीतल दरंदळे
4
CONTACT ON 9595030385 ON WHATSAPP