जगात स्त्री गुन्हेगार नाहीत असे नाही. परंतु क्रूर आणि निर्घृण गुन्ह्यांमध्ये महिलांचा सहभाग तितकासा असत नाही. त्यातही सिरीयल किलर प्रकारातील स्त्री गुन्हेगार क्वचितच आढळतात. आज आम्ही ज्या सरदार पत्नीबद्दल सांगणार आहोत तिने हा समज खोडून काढला आहे. तिच्या भयंकर खूनसत्राने आजही थरकाप उडतो. तिने एक नाही, दोन नाही, तब्बल ६५० मुलींची हत्या केल्या होत्या.
या शेकड्याने केलेल्या हत्या आणि त्या मागचं कारण आणि घडलेला इतिहास याबद्दल सविस्तर वाचूया !!
एलिझाबेथ बॅथरी (Elizabeth Bathory) असे त्या क्रूर महिलेचे नाव आहे. ती युरोपातील ‘हंगरी’ (Hungary) या देशातल्या फेरेंक नॅडेस्डी नावाच्या सरदाराची बायको होती. या सरदाराने तुर्कांविरुद्धच्या लढाईत विजय मिळवला होता. यानंतर तो ‘नॅशनल हिरो’ ठरला होता. त्याने मिळवलेला विजयामुळे त्याची पत वाढली होती. सरदार पत्नी म्हणून एलिझाबेथलाही खूप मान मिळायचा. तिने त्याचा गैरफायदा घेतला. १५९० ते १६१० या काळात तिने ६५० हत्या केल्या. यासाठी तिला ४ नोकरांनी मदतही केली. इतके वर्ष हे राजरोसपणे चालू होतं, पण अखेर सुजेन या महिला नोकरने या सरदार पत्नीच्या क्रूरपणाविषयी वाच्यता केली.
तिने केलेल्या तब्बल ६५० मुलींच्या हत्येबद्दल तिचं नाव गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड (Guinness Book of World Records) मध्येही नोंदवण्यात आलंय.
हे वाचून तुम्हाला नक्कीच प्रश्न पडला असेल की तिने हे का केलं?
तर, त्याचं कारण असं की तिला कोणीतरी सांगितलं होतं, सौंदर्य टिकवायचं असेल तर कुमारी मुलींचा बळी दे. तिने ते ऐकून मुलींना मारायला सुरुवात केली. असं म्हणतात त्याच रक्ताने ती अंघोळ करत असे. एलिझाबेथ मुलींना गावांमधून बोलावून घेत असे. त्यांना काम द्यायचं आमिष दाखवले जायचे. राजघराण्यात काम मिळेल या उद्देशाने त्या बिचाऱ्या मुलीही महालात यायला तयार व्हायच्या. एकदा का मुली महालात आल्या की मात्र त्यांची सुटका नव्हती. त्यांची हरप्रकारे छळवणूक व्हायची. हत्या करतानाही त्यांच्या शरीराचे एक एक तुकडे कापले जायचे. हाल हाल करून अतिशय निर्दयतेने त्यांना मारले जायचे.
१५९० ते १६१० या काळात या ६५० हत्या करण्यात आल्या. यासाठी तिला ४ नोकरांनी मदतही केली. इतकी वर्षे हे राजरोसपणे चालू होतं, पण अखेर सुजेन या राणीच्या महिला नोकराने या सरदार पत्नीच्या क्रूरपणाविषयी वाच्यता केली.
हत्याकांडाचा तपास करणारे अधिकारी जॅकब स्जिल्वेसी यांनी या घटनेचा तपास केला. एलिझाबेथ च्या महालात त्यांना आजूबाजूला अनेक मृतदेह आणि हाडांचे सांगाडे सापडले. त्या मृतदेहाची अतिशय वाईट विटंबना केलेली होती.हंगेरीच्या बादशाहांना एलिजाबेथच्या या कृत्याची माहिती मिळाली तेव्हा त्यांनी या प्रकरणाचा तपास करण्याचे आदेश दिले. यानंतर मात्र या गुन्ह्याचं गांभीर्य समोर आलं.
गुन्हा सिद्ध करण्यासाठी महालातील अनेकजण समोर आले. यात एलिझाबेथच्या तावडीतून सुटलेल्या मुलीही होत्या, तर ज्या मुलींची हत्या होणार होती अशा काही मुलीही होत्या. जवळजवळ ३०० जणांनी तिच्याविरुद्ध साक्ष दिली. अनेकजणांनी ती किती क्रूरपणे वागली याची सर्व माहिती दिली. अखेर १६१० मध्ये तिला अटक झाली आणि तिच्या महालातच तिला कैद केले गेले. फाशीची शिक्षा सुनावली गेली पण त्याची अंमलबजावणी मात्र झाली नाही. अखेर १६१४ मध्ये वयाच्या ५४व्या वर्षी तिचा मृत्यू त्याच महालात झाला.
अनेक शूर स्त्रियांचा इतिहास आपण वाचतो पण असा थरकाप उडावणारा काळा इतिहास वाचला की विश्वास बसत नाही. पण ही एक सत्यकथा आहे.
लेखिका: शीतल दरंदळे