जग फिरावंसं वाटतंय, पण पैसे नाहीत? हे दोघे चहा विकून २३ देश फिरलेत!
 

ट्विटरसारख्या माध्यमातून आज अनेक गोष्टी घडत आहेत. कधी राजकीय, सामाजिक उलथापालथी घडायला चार ओळींचं ट्विट कारणीभूत असतं तर कधी प्रवासात केलेलं मदतीच्या आवाहनाचं ट्विट तत्काळ मदत पोहोचवितं.

क्षणात होत्याचं नव्हतं करतं तर एखादा अनोळखी अंधारात असणारा चेहरा प्रसिध्दीच्या झोतात आणतं. अलिकडेच प्रख्यात उद्योगपती आनंद महिंद्रा यांच्या ट्विटनं एक अनोखं जोडपं चर्चेत आणलं.

आपल्या ट्विटमधे आनंद महिंद्रा यांनी लिहिलं आहे की, माझ्यामते देशातील हे सर्वात श्रीमंत असं जोडपं आहे या जोडप्याच्या उपक्रमांमुळे अनेकांना प्रेरणा मिळाली आहे. कोण आहे हे जोडपं? आणि असं काय केलं त्यांनी?

भारतीय पर्यटक आणि इतर देशातील पर्यटक यांच्यात एक मुख्य फरक आहे. तो म्हणजे, सर्वसाधारणपणे भारतीय पर्यटक हे पर्यटनाकडे थोडे जास्तीचे पैसे असतील तर पुरवायची हौस या दृष्टिने पहातात.

प्रत्येकजण पर्यटन करू शकतो किंबहुना ते करायला हवं ही मानसिकता अजूनतरी भारतात नाही. परदेशी पर्यटक हे कमीत कमी सामान आणि पैशांनी जग फिरत असतात. भारतीय पर्यटक ही रिस्क घेत नाहीत.
असं असलं तरीही गेल्या काही वर्षांत हे चित्र हळू हळु बदलत आहे. भारतातले काहीजण धाडसी प्रवासी बेत आखून ते यशस्वीरित्या पारही पाडत आहेत. पर्यटन हे पैसा गाठीशी असणार्‍याची मक्तेदारी उरलं नाही.

अगदी सामान्य आणि तुटपुंजी कमाई असलेलाही योग्य त्या प्लॅनिंगनं प्रवास केला तर आरामात पर्यटन करू शकतो. असंच प्लॅनिंग करून जग फिरलेलं केरळचं एक सामान्य जोडपं सध्या चर्चेचा विषय बनलं आहे.

केरळमधील कोच्चि येथील विजयन आणि मोहना हे ते जोडपं. या जोडप्याचं बालाजी कॉफी हाऊस नावाचं चहा, कॉफीचं दुकान आहे. आज सत्तरीच्या घरात असलेलं हे जोडपं १९६३ पासून चहा कॉफी विकत आहे.

या दुकानातून केलेल्या कमाईतून या दोघांनी एक दोन नव्हे तर तब्बल २५ देशांची भ्रमंती केलेली आहे. लहानपणापासूनच प्रवास करणं हा विजयन यांचा ध्यास होता.

त्यांना भरपूर प्रवास करून सगळं जग बघण्याची इच्छा अगदी लहानपणापासूनच होती. लहानपणी एक गंमत म्हणून, लहान मुलाचं बालिश स्वप्न म्हणून याकडे इतरांनी बघितलं असलं तरीही विजयन यांनी मात्र हे स्वप्न जिवापाड जपलं होतं.

आयुष्यात हे स्वप्न आपण साकार करूच ही दुर्दम्य इच्छाशक्ती त्यांनी बाळगली होती. आपल्या पत्नीला त्यांनी ही इच्छा बोलून दाखविल्यावर तिनंही या स्वप्नाला हवा दिली.

आपली कमाई काय? आणि आपण स्वप्नं काय बघतोय? असं सांगुन तिनं त्यांचा हिरमोड केला नाही उलट त्यांना सर्वतोपरी साथच दिली. रोजच्या कमाईतून हे दोघे ३०० रूपये बाजूला काढून ठेवू लागले.

थोडेफार पैसे साठल्यावर त्यांनी बँकेतून कर्जही घेतलं आणि आपलं जगभ्रमंतीचं स्वप्न पूर्ण केलं.

विजयन आणि मोहना यांनी गेल्या बारा वर्षांत २५ देशांना भेटी दिल्या आहेत त्यात सिंगापूर, अर्जेंटिना, ब्राझिल, पेरू असे २३ देश त्यांनी आजपर्यंत बघून झालेले आहेत. आता २०२१ या वर्षात आधीच्या प्रवासासाठी घेतलेलं कर्ज फेडून मग नव्या प्रवासाला निघण्याचा त्यांचा बेत आहे.

सत्तरी हे खरं तर भारतीयांचं निवृत्तीचं वय. या वयात नवीन कर्ज करायची नाहीत आणि मुला-नातवंडात रमत भजन किर्तनाला लागायची पध्दत असते. मात्र विजयन आणि मोहना याला अपवाद आहेत. निवृत्तीच्या वयातही नवनवीन भटकंती प्लॅन्स आणि त्याच्या पूर्ततेच्या दृष्टीने तयारी करणं हेच त्यांचं जगणं बनलं आहे.

ही भटकंती अनेकांसाठी प्रेरणा बनू शकेल हेही त्यांनी जाणलं कारण कमीत कमी पैशातही पर्यटन करता येणं शक्य आहे हे आजही सामान्य भारतीयांना न पटणारं आहे. योग्य ते प्लॅनिंग आणि थोडी मानसिक तयारी असेल तर जगभ्रमंती कठीण नाही हे या जोडप्याला सगळ्यांना सांगायचं होतं.

आपले अनुभव इतरांसाठी मार्गदर्शक ठरावेत असं त्यांना वाटत होतं आणि यातून साकारलं गेलं दीडशे पानी पुस्तक,’ छाया वित्तू विजयन्तेयुम मोहानायुदेयुम लोक संचारंगल”. या महिनाभरात हे पुस्तक वाचकांच्या भेटिला येणार आहे.

या पुस्तकात त्यांनी फ़िरलेले सगळेच्या सगळे पंचवीस देश नसले तरिही बरेचसे देश आणि त्या प्रवासातले अनुभव वाचता येणार आहेत.

अशा प्रकारचं पुस्तक लिहावं आणि ते प्रकाशित करावं ही कल्पना या जोडप्याच्या मनात साधारण तीन वर्षांपूर्वी आली. एका travel publication च्या कार्यक्रमात त्यांना प्रमुख अतिथी म्हणून आमंत्रित करण्यात आलं होतं.

या कार्यक्रमाला गेल्यानंतर त्यांना पुस्तक लिहिण्याची कल्पना सुचली. कल्पना सुचली तरीही ती वास्तवात आणणं कठीण होतं कारण, परिस्थितीमुळे या दोघांनीही शिक्षण फार लवकर सोडलं होतं त्यामुळे सांगण्यासारखं बरचं काही असलं तरिही ते शब्दांत व्यक्त करता येत नव्हतं.

त्यामुळे त्यांनी या अनुभवांना शब्दांकीत करवून घेतलं आणि पुस्तकाचं कामही पूर्ण केलं. दोन महिने आणि १५ बैठकांत लेखकाला सर्व अनुभव सांगून या पुस्तकाच्या लिखाणाला सुरवात झाली. दीडशे पानी पुस्तकाची किंमत १९९ इतकी असून याच्या विक्रीतूनही त्यांच्या पुढच्या भ्रमंतीला आर्थिक हातभार लागणार आहे.

सगळं जग करोना नावाच्या संकटानं ग्रस्त असताना, चिंतीत असताना आणि आपापल्या घरात कुलुपबंद होऊन बसलेलं असताना हे जोडपं या नोव्हेंबरमधेच ऑस्ट्रेलिया आणि न्युझिलण्डहून परतलं आहे.
आता काही महिन्यांचा ब्रेक घेऊन पुढील वर्षी पुढची भ्रमंती आखण्यात येणार आहे. या प्रवासासाठी आर्थिक मदत म्हणून परिचितांनिही आपणहून मदत केलेली आहे आणि चार लाखांचं कर्जही या दोघांनी उचललं आहे.

मात्र हे सगळं कर्ज आपणच फेडायचं अशी त्यांची जिद्द आहे त्यामुळे हे कर्ज फिटल्यावर पुढचा देश कोणता? हे ठरेल. एक मात्र नक्की आहे की इस्टयुरोपियन देशच आता पुढचं लक्ष्य असणार आहे हे त्यांचं ठरलं आहे.

काही वर्षांपूर्वी एक चहावाला या देशाचा पंतप्रधान झाला म्हणून “चायवाला” ही संज्ञा लोकप्रिय झाली आता केवळ चहाविक्रीतून पैसे कमवून जग भ्रमंती करून विजयन यांनी पुन्हा एकदा “चायवाला’ हे संबोधन चर्चेत आणलं आहे. एकूणच या देशातला सामान्य “चायवाला” काहीही करू शकतो हेच खरं.

 
This Post Has One Comment

  1. “आपल्या नियतीचे मालक बना पण परिस्थितीचे गुलाम बनू नका”.
    हे साकार करून दाखवले यांनी…….
    सलाम यांच्या जिद्दीला

Leave a Reply