हायलाइट्स:
- दहावीच्या विद्यार्थ्यांना निकालाची प्रतीक्षा
- आर्ट्स, सायन्स की कॉमर्स? काय निवडायचे हा प्रश्न
- विद्यार्थी आणि पालक दोघांनीही जाणून घ्या टिप्स
Career After SSC: यूपी, सीबीएसईसह देशभरातील इतर राज्यांचे बोर्ड हळूहळू दहावीचे निकाल जाहीर करत आहेत. महाराष्ट्र बोर्डाचा दहावीचा निकाल देखील पुढील आठवड्यात येण्याची शक्यता आहे. विद्यार्थी निकालाबाबत चिंतेत असतानाच दुसरीकडे निकाल जाहीर झाल्यानंतर अकरावीत आर्ट्स, सायन्स, कॉमर्सपैकी कोणती स्ट्रीमची निवड करायची, असा प्रश्नही सतावत आहे. बर्याचदा विद्यार्थ्यांना स्ट्रीम निवडताना खूप अडचणींना तोंड द्यावे लागते. बऱ्याचदा विद्यार्थी कोणत्या क्षेत्रात करिअर करणार हे येथेच ठरविले जाते. विद्यार्थ्यांसोबतच त्यांच्या पालकांनाही आपल्या पाल्याने कोणत्या क्षेत्रात पुढे जावे, याची चिंता सतावत आहे. अशा परिस्थितीत विद्यार्थी आणि पालक दोघांनाही तणावातून मुक्त होण्यासाठी काही सोप्या टिप्स सांगणार आहोत. ज्यांच्या मदतीने तुम्हाला स्ट्रीम निवडण्यात कोणतीही अडचण येणार नाही.
तुमचे प्राधान्ये जाणून घ्या
सर्वप्रथम, कोणतेही स्ट्रीम निवडताना, तुम्हाला कोणत्या विषयात रस आहे हे जाणून घेतले पाहिजे. तुम्ही एखाद्या विषयाचा अभ्यास करण्यास उत्सुक आहात की नाही? हे जाणून घेणे खूप महत्त्वाचे आहे. तुम्हाला जे विषय आवडतात तेच तुम्ही अभ्यासायचे निवडले पाहिजेत. यासह, त्या विषयाबद्दल जाणून घेण्यासाठी अधिक उत्सुक राहणे गरजेचे आहे.
तुमची ताकद समजून घ्या
तुमचा आवडता विषय तपासण्यासोबतच तुम्हाला कोणत्या विषयात पकड आहे हे देखील समजून घ्यावे लागेल. तुम्ही कोणत्या विषयात चांगले गुण मिळवता? बहुतांश वेळा विद्यार्थ्यांना सोशल सायन्समध्ये जास्त गुण असले तरी त्यांचा कल मात्र सायन्सकडे असतो. ते आर्ट्समध्ये जास्त चांगले गुण मिळवू शकतात. पण त्यांना हे लक्षात येत नाही.
पालकांचे ऐका
काहीवेळा पालकही विद्यार्थ्यांना स्ट्रीमबाबत समजावून सांगतात. मुलांनी कोणत्या क्षेत्रात प्रगती करावी हे ते सांगतात. अशा परिस्थितीत तुमचे मत पालकांच्या मताशी न जुळण्याची शक्यता आहे. तुमची पसंती आणि धारणा कोणत्या क्षेत्रात आहे हे पालकांना समजावून सांगा आणि त्यानंतरच निर्णय घ्या.
बजेट लक्षात ठेवा
कधी कधी तुमची स्वप्ने मोठी असतात. पण आई-वडिलांना आर्थित परिस्थितीमुळे हे शिक्षण देणे शक्य नसते. अशावेळी अभ्यासक्रम निवडताना आणि पुढे जाताना विद्यार्थ्यांनी पालकांची परिस्थिती लक्षात घेऊनच क्षेत्र निवडावे.
दहावीच्या निकालासंदर्भात अपडेट
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (Maharashtra State Board of Secondary and Higher Secondary Education, MSBSHSE) बारावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांना आता दहावीच्या निकालाची प्रतीक्षा आहे. महाराष्ट्र बोर्डाचा दहावीचा निकाल कधी लागणार? याबद्दल प्रश्न विचारले जात आहेत. दरम्यान दहवीच्या परीक्षेत बसलेले विद्यार्थी mahresult.nic.in आणि mahahsscboard.in या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन त्यांचे स्कोअरकार्ड पाहू शकतील.
महाराष्ट्र बोर्डाने यापूर्वीच बारावीचा निकाल जाहीर केला आहे. दहावीची मूल्यमापन प्रक्रिया पूर्ण झाली असून शिक्षणमंत्र्यांच्या पुष्टीनंतर पुढील आठवड्यापर्यंत निकाल जाहीर होणार असल्याची माहिती मंडळाच्या अधिकाऱ्याने दिली होती. निकाल पाहण्यासाठी विद्यार्थ्यांना रोल नंबर आणि आईचे नाव टाकावे लागेल. दहावीचा निकाल १५ जून रोजी जाहीर होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. दरम्यान विद्यार्थ्यांनी अधिकृत माहितीसाठी मंडळाची वेबसाइट पाहण्याचा सल्ला देण्यात आला आहे. तसेच शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड लवकरच यासंदर्भात घोषणा करतील.